घे भरारी
गेल्या वर्षी अनंत चतुर्दशी च्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहाने विसर्जनाचे गणपती बघायला म्हणून माझी आणि अजयची जोडगोळी रात्री ८ वाजता शिवतीर्थावर जाऊन थडकली . २-३ दिवस मला ताप आला होता आणि घरी राहून खूप कंटाळा आला होता म्हणून हा अट्टाहास केला होता . गणपती बाप्पाच्या इच्छेनुसार ‘ घालीन लोटांगण वंदीन चरण ‘ हे आरतीमधील चरण मी रस्त्यावरच आचरणात आणलं . अचानक डोळ्यासमोर काळोख आला आणि मी रस्त्यातच साष्टांग नमस्कार घातला . लगेचच सावध झाले . डोळे उघडले तेव्हा अनेक डोक्यांचं एक कोंडाळं माझ्या भोवती होतं पण अजय मात्र दिसत नव्हता . तो लोकांना बाजूला सारून पुढे यायचा प्रयत्न करत होता . अहो फारसं काही लागलं नाही हो , असं लोकांना सांगून मी मोकळी झाले आणि सगळे आपापल्या वाटेने जायला मोकळे झाले .पण पुढे काय वाढून ठेवलंय याची थोडीफार कल्पना मला आली होती . सावध झाल्यानंतरची माझी धिटाई बघा . मी आणि अजय अगदी सहजपणे येतो तसे स्कूटर वरून घरी आलो .
माझी उजवी बाजू आणि उजवा खांदा रस्त्यालगतच्या फूटपाथ वर जोरात आपटला होता . मी वेदनेने कळवळले होते . पुढील कित्येक दिवस माझी पेंद्यासारखी अवस्था झाली होती . सहज हात घालता यावा म्हणून घातलेले ढगळ टी शर्ट , पुढील बटणांचे शर्ट आणि पेंद्यासारखा धरलेला हात ही माझी मूर्ती आठवून मला आता हसूच येतं पण तेव्हा मात्र ब्रम्हांडं आठवलं होतं . वारा बाजूने गेला तरी हात दुखेल की काय अशी भीती वाटत होती . Postural Hypotension मुळे पडले असेन असं प्रार्थामिक निदान करण्यात आलं . ( म्हणजे बीपी अचानक कमी होतं ) आणि खरोखरीच माझं बीपी ८०/६० झालं होतं . मग काय तऱ्हेतऱ्हेची पेये 😂 , सरबते , electrolytes यांचा मारा केला . अजिबात उठताही येत नव्हतं , बरं आधार घ्यावा तर एक हात दुखरा म्हणून आळशीपणे लोळत पडण्याचा आनंद मनमुराद नाही , पण लुटता आला . भरीस भर म्हणून Vertigo ने पण हजेरी लावली . निमिषार्धात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा कशी घालू शकतो याचा साक्षात्कार झाला . 😀😀
अजयच्या मदतीने जाऊन खांद्याचं ultrasound करून घेतलं पण त्यात फक्त सूज आलीये असं दिसलं आणि मी हुश्श केलं .
मी dispensary ला चक्क कुलूप लावलं आणि कम्पल्सरी आराम घ्यायचं ठरवलं . हळूहळू दुखणं कमी झाली . माझं आणि अजयचं पर्थ चं १७ डिसेंबर च बुकिंग झालं होतं . अमृताशी गप्पा मारताना लक्षात आलं की डिसेंबर मध्ये मी पर्थ ला आधी गेले तर नीलचा शाळेत जाण्यायेण्याच्या सोबतीचा प्रश्न सुटेल . यात हात वापरण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून दीड महिन्याच्या आरामानंतर अजून एक धाडस केलं . संपूर्णपणे कॅन्सल होण्याच्या माझ्या पर्थ च्या ट्रीप च तिकीट prepone करून दोन बॅग्स सकट ८ डिसेंबर ला मी एकटी पर्थ ला जाऊन थडकले . माझा मुलगा आणि सून मला संपूर्ण आराम देतील याची मला खात्रीच होती . आता मी मस्त बरी होत्ये अशी गर्जना करून मी ३० डिसेंबर ला परत आले .
डिस्पेन्सरी कुलुपातून मुक्त केली . हळू हळू माझी कामे सुरू केली , ड्रायव्हिंग सुरू केलं आणि मला कळायला लागलं की माझा खांदा खोटा खोटाच बरा झालाय . अखेर MRI ने खरं निदान दाखवून दिलं .
SSP Tear . हाय रे माझ्या दैवा . म्हणजे supraspinatous या स्नायूचा tendon ३/४ th तुटला होता ज्यामुळे मला असह्य वेदना होत होत्या आणि हात बाजूने आणि पुढे उचलता येत नव्हता . आता सर्जरी अटळ आहे अशा विचाराने मी आणि अजय चिंतातुर होऊन बसलो होतो . तेवढ्यात अजयला डॉक्टर रोहित साने शोल्डर surgeon यांची आठवण झाली . आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या घरीच बोलावून घेतले आणि तुमची सर्जरी वाचू शकेल असं आश्वासन दिलं .
डॉक्टर रोहित साने आणि स्पोर्ट्स physiotherapist डॅाक्टर वेदांग वैद्य या दोन देवदूतांचं माझ्या आयुष्यात आगमन झालं . डॉक्टर सानेंनी दिलेला nerve ब्लॅाक आणि steroid injection यामुळे माझी चार महिन्यांची दूख पळून गेली , मला अगदी स्वर्गसुख मिळालं . सर्जरी लागणार नाही हा दिलेला आत्मविश्वास आणि आणि डॉक्टर वेदांग यांच्याकडूनच फिजिओथेरपी सेशन्स करून घ्या या सल्ल्यामुळे माझा पुढील आशादायी प्रवास सुरू झाला .
ठरल्याप्रमाणे ५ फेब्रुवारीला संध्याकाळी दारावरची बेल वाजली . मी दार उघडले . मला प्रथम त्या माणसाचे धडच दिसले बाहेर safety door असल्यामुळे . मग जरा वाकून बघितलं तर अगदी शंतनु सारखाच म्हणजे माझ्या धाकट्या मुलासारखा दिसणारा एक मुलगा दारात उभा होता . तेच डॉक्टर वेदांग होते . ए अशी एकेरी हाक मारण्याचा खूप वेळा मोह झाला पण आवरला . गुरु आणि शिष्य असा एक प्रवास सुरू झाला .
हसरा चेहरा , वाणी अतिशय गोड , व्यायाम करून घेण्याची हातोटी आणि सर्जरी टाळू शकतो हा दिलेला विश्वास यामुळे दुखरे व्यायामही सुसह्य झाले . मग मी पण निश्चय केला की सर्जरी चा हल्ला परतवून लावायचाच . इतके निरनिराळे आणि निरनिराळ्या पद्धतीने व्यायाम होऊ शकतात हे अनुभवानेच समजतं . मी नुसतं म्हटलं की असा व्यायाम करताना खूप दुखतं तर दुसऱ्या पद्धतीने व्यायाम करुन घेण्याची युक्ती तय्यार . मधे मधे , छान करताय तुम्ही ! मस्त होतोय तुमचा व्यायाम ! असं म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असे . एकदोन वेळा मी खूपच हताश झाले , व्यायामाने माझा हात खूप दुखायचा . बाजूला काढून ठेवता आला असता तर किती बरं झालं असतं असे वेडे विचार मनात येत असत . पण तुमची खरोखरच छान प्रोग्रेस आहे अशा त्यांच्या आश्वासक वाक्यांनी माझं मन परत एकदा उचल खायचं . गोडगोड बोलून व्यायाम करून घेण्यात वेदांग एकदम प्रवीण . आता आपण १५-१५ चे २ सेट्स असे तिन्ही व्यायाम करून मग थांबू . म्हणजे पाहा ३० त्रिक ९० वेळा व्यायाम करा असं सांगण्याऐवजी कधी थांबवूया हे सांगतात म्हणजे त्या आशेवर मी आपसूकच आज्ञापालन करते व्यायाम झाल्यावर छान आयसिंग करुन घ्या असं सांगायला विसरत नाहीत . व्यायाम केल्याबद्दल बक्षीस म्हणून माझ्यासाठी एक आईस कँडी तो बनती है । 😀😂 तुम्ही घातलेली कायम व्यायाम करण्याची अट मी तंतोतंत पाळीन . आता आमचा हा प्रवास शेवटच्या वळणावर आहे . तो संपण्याच्या आधी माझं लिखाण त्यांना भेट म्हणून पाठवण्याचा माझा मानस होता म्हणून हा प्रपंच केला .
डॉक्टर रोहित आणि डॉक्टर वेदांग यांनी दिलेली योग्य treatment , माझा सखा अजय याचा आश्वासक आणि भक्कम आधार , अलका , तृप्ती सारख्या माझ्याकडे कामाला असणाऱ्या सख्यांची मदत , आई बाबांचे आशीर्वाद ,आप्तेष्टांच्या शुभेच्छा , सूना मुलांचं भक्कम पाठबळ , माझी physiotherapist बहीण डॉक्टर सविता आणि जुन ते सोनं असे माझे physiotherapist वडील Dr Mhaskar , यांचे वेळोवेळी दिलेले सल्ले , यामुळेच आज मी फिरून माझ्या पुढील योजनांची आखणी करायला आणि त्या अमलात आणायला भक्कम उभी राहिले आहे . माझा उजवा हात फिरून एकदा डाव्या हाता सारखाच भरारी घ्यायला सक्षम झालाय .
पण गणपतीबाप्पा मी मात्र यापुढे तुला उभ्यानेच नमस्कार करणार बरं का 🙏🙏
सुषमा म्हस्कर
( डॅा मीनल पेंडसे )